Pages

Tuesday, August 13, 2013

रत्न (काजळमाया)

पण त्याच क्षणी तो अतिशय अस्वस्थही झाला. रक्तपुषांचा वृक्ष भूतकाळात भव्य अग्निछत्राप्रमाणे वाटे, तो आज पाहता पूर्ण क्षुद्र वाटला. प्रासादतुल्य वाटणा-या घरावर विरुप दैन्याची कळा होती. आपण आपला निर्णय कळवून पाठ फिरवताच आपल्या भावी पत्नीच्या मुखावर मुक्ततेचा विलक्षण भाव दिसला, हा विशेष भूतकाळात त्याच्या दृष्टीला जाणवला नव्हता. आईची आकृती कंपित, अस्पष्ट झाली. तिच्या डोळ्यांची क्षितिजे अतिमर्यादित होती. तिच्या सर्वांगाला घरकुलाचा कोंदट दर्प होता, आणि ती परतली त्या वेळी तिच्या मुखावर आपल्या अपत्याचे जीवन मात्र इतरांप्रमाणे सुरक्षित, अतिपरिचित आलेखाने घडले नाही याविषयी अत्यंत स्पष्ट लज्जा होती. हा भाव या क्षणी पाहाताच तो अतिविस्मित झाला. बेडकाच्या अगणित चिक्क्ट, गोल अंड्यांप्रमाणे आपले आयुष्यही आणखी एक चिक्कट गोल अंडे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती, हे पाहून विषादाने त्याचे मन काळवंडले.

“पाहिलंस? गरुडाने म्हटले, “मी तुला प्रथमच सुज्ञ उपदेश केला होता. अरे, एकेकाळी ज्यावर अमर्याद प्रेम केलं, त्याकडे कधीही पुन्हा उत्तरदृष्टीक्षेप करू नये. वर्तमानातील प्रखर प्रकाशात भूतकालाची कोमल पुष्पं म्लान होऊन मृत होतात. स्मृतीने उजळलेली शोभिवंत मायानगरं क्षणात उद्ध्वस्त होतात. भूतकालातील घटना, व्यक्ती, अखंड नदीप्रवाहावर सोडलेल्या दीपमालेप्रमाणे असतात. दीपदानानंतर परत वळून त्यांच्याकडे दृष्टिक्षेप केला तर ते विझतात किंवा प्रज्वलित होऊन नष्ट होतात.”

-जी. ए. कुलकर्णी [रत्न (काजळमाया)]

No comments: