Pages

Tuesday, August 13, 2013

इंग्रीड बर्गमन

इंग्रीड बर्गमन
आषाढातील भर्जरी मेघांसारखे पूर्ण ऐहिक डोळे
घेऊन तू आलीस;नेस्तनाबूत झालेल्या या
साथीच्या गावात.
विश्वरचनेतिल बर्फाचा शुभ्र पहाडी अहंकार
या गांवांत आणून सोडलेला....
जशा अनेक बाबी किंवा अरण्यांतील निर्मनुष्यतेच्या
पारावर पडलेली हजारो फुले...
हजारो फुले तशी हजारो घरे या अनामिकांच्या प्रदेशांत
तुझा घोडा तू मोकळा सोडलास
शिशिराच्या निर्विघ्न कुरणात...
तो मध्येच दिपून पाहतो,एका नसलेल्या ध्रुवाच्या
दिशेंत झिजणाऱ्या तुझ्या देहास.
तुला वाटतात तितके सोपे नसतात तुझे अश्रू
पाण्याच्या सलिल संभ्रमांत हलतात जखमी
ख्रिस्ताच्या घंटा रात्रंदिवस....
गांवावर साचलेल्या बर्फातून अध्न्यात निनादांची
महापर्वणी जाऊ लागते.
तसे माझ्या झोळीत काही नाही;जाण्यायेण्याच्या
चित्रलिपीत झाडांचा एखादा संगमरवरी सांगाडा,
तोही चांदण्यांनी शोषून घेतलेला...
फक्त एवढेच: नि:शब्द भासांच्या काठाला लटकलेले
हे स्टेशन आणि संवेदनांच्या आवर्तांना झुगारून
कोण्या मावळत्या संताला तू दिलेले
एकाकी आलिंगन.

-ग्रेस

No comments: