Pages

Tuesday, August 13, 2013

मरण

मरण

अंधारांतून जात कुणीतरी गात पुढे क्षितिजाला
मातीमधला पाऊस घेऊन सुगंध इथवर आला.

सुन्न निरामय चिरनिद्रेपरि नभ माथ्यावर गढले.
प्रारब्धातिल विश्व कुणाचे जसे तमावर निजले....

अंधारातुन सरकत जाती झाडांचे जड पुतळे
कुणी मांडिले? कशास माझे लोचन भरून आले....

ध्वनिबंधावर तूच उभी कि युगे निळावत गेली.
आभासांतील हिमशिखरांची रांगच घसरत आली....

उभे धराया मला पुरांतून सूर समाधी ल्याले
हृदयांमधले अमृत प्याया मरण कोठवर आले....

ग्रेस

No comments: